
जळगाव मिरर | २६ मार्च २०२६
जमीन खरेदीची नोंद करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून जळगाव तालुक्यातील करंजा सजातील तलाठी अजय बिडवे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावाने हद्दीत शेती जमीन खरेदी केली होती. त्या खरेदीची नोंद संबंधित क्षेत्रात करण्यासाठी तलाठी अजय बिडवे यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
याबाबत तक्रारदाराने २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता तलाठी बिडवे यांनी जमीन खरेदी नोंद लावण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तक्रारदाराने लाच देण्यासाठी गेल्याचा संशय आल्याने त्यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाच मागितल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्मिता नवरे तसेच पो.नि. हेमंत नागरे, पोउनि. दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ. संगीता पवार
पोना. बाबू मराठे, पोका. अमोल सूर्यवंशी, पोका. गणेश ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे महसूल विभागातील कामकाजातील पारदर्शकतेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.





















