
जळगाव मिरर | ३१ जुलै २०२५
धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ रस्त्यावर झालेल्या अपघातात सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मनिषा राहुल पाटील (वय ७ वर्षे, रा. सातरणे, ता. जि. धुळे) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद अखेर धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी, ३० जुलै रोजी दुपारी ३ वाजता अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मनिषा पाटील ही पिंप्री गावाजवळ रस्ता ओलांडत असताना अचानक वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.
या अपघातानंतर सायंकाळी ९ वाजता पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. सुरुवातीला रामानंद पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, कागदपत्रांची आणि घटनास्थळाची पडताळणी केल्यानंतर अपघाताची जागा धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अखेर अधिकृत नोंद धरणगाव पोलिसांकडे करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू पाटील हे करत आहेत. या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




















