
जळगाव मिरर | २६ मे २०२५
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी व बिडगाव येथील कै. ओंकार गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त क्रीडाशिक्षक सुरेश महाजन यांचा अपघाती मृत्यू झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, खो-खोचे राज्यस्तर पंच तसेच सातपुडा पायथ्याच्या आदिवासी भागातून खो-खो क्रीडा प्रकारात मुलींना सतत राज्यस्तरापर्यंत घेऊन जाणारे निवृत्त क्रीडाशिक्षक सुरेश पितांबर महाजन (वय ६०) यांचे २४ मे रोजी रात्री १०.३० वाजता अपघाती निधन झाले.
सुरेश महाजन हे सूर्यवंशी गुजर युवक सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष व सतपंथ ज्योत मंदिर व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात बहुतांशी खेळाडू घडवले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने धानोरासह परिसरात शोककळा पसरली आहे. तर धानोरा परिसरातील आदर्श क्रीडाशिक्षक गमावल्याने दुःख व्यक्त होत आहे.




















