अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर व पारोळा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी ३१२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. यात हायब्रीड अँम्युनीटी अंतर्गत दोन मोठ्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून पारोळा अमळनेर ते जळोद व पारोळा बहादरपूर ते जानवे या प्रमुख रस्त्यांचा सामावेश आहे.
महाराष्ट्र शासन बांधकाम विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव अंतर्गत हायब्रीड अँम्युनीटी भाग २ अंतर्गत अमळनेर मतदारसंघात ५७ किमीच्या दोन मोठ्याा रस्त्यांना मंजुरी मिळाली. असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली असून यात पारोळा अमळनेर ते जळोद आणि जानवे- बहादरपूर- पारोळा रस्त्याचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. सदरचे रस्ते नव्या धोरणानुसार ट्रीमिक्स काँक्रीटीकरणचे होणार असल्याने अनेक वर्षांसाठी हे रस्ते वरदान ठरणार आहेत.
जळोद ते पारोळा रस्त्यासाठी २०६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य मार्गावर पारोळा ते अमळनेर आणि अमळनेर ते जळोद या दरम्यान रस्ता काँक्रीटीकरण होणार आहे, हा रस्ता २ पदरी रस्ता होणार असून यात रस्त्याची रुंदी व पुलांची रुंदी देखील वाढणार आहे. सदर रस्ता महाराष्ट्रातील चोपडा व शिरपूर या तालुक्यांना पर्यायी मार्ग ठरणार आहे. अमळनेर मतदारसंघातील जळोद, अमळगाव, गांधली, अमळनेर, सडावन, रत्नापिंप्री, पारोळा या गावांमधून हा रस्ता जाणार आहे. त्याच प्रमाणे जानवे ते पारोळा या रस्त्यासाठी १०६ कोटींचा निधी मंजूर झाला असून २५ किमीचा काँक्रिटीकरण रस्ता हा होणार आहे. रस्त्याची रुंदी साडे पाच मीटर असणार आहे. जानवे, कावपिंप्री, सुमठाणे, इं धवे, जीराळी, बहादरपूर, महाळपूर, शेवगे, बोदर्ड, पारोळा या गावामधून जाणारा हा रस्ता असून ग्रामिण जनतेसाठी हा रस्ता वरदान ठरणार आहे.
सदर रस्त्यांची टेंडर प्रोसेस देखील झाली असुन लोकसभा निवडणुकीनंतर या रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. सदर रस्त्यांच्या मंजुरीबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.