जळगाव मिरर | २७ डिसेंबर २०२४
दोन लाखांची लाच घेणाऱ्या बहाळ (ता. चाळीसगाव) येथील ग्रामपंचायतीचा सरपंच, लिपीक व पंटर अशा तीन जणांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. बहाळ गावातच गुरुवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच राजेंद्र महादू मोरे (५७), ग्रामपंचायत लिपीक शांताराम तुकाराम बोरसे (५०) व पंटर सुरेश सोनू ठेंगे (४०) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ७० वर्षीय तक्रारदार यांची बहाळ रथाचे, ता. चाळीसगाव येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर ग्रामपंचायत, बहाळ हे त्यांचा हक्क दाखवून ही जागा परस्पर इतर व्यक्तीस भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता होती. त्यामुळे तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीविरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला. त्यानंतर सरपंच राजेंद्र मोरे याने तक्रारदार यांना भेटून त्यांच्या शेतजमिनीबाबत ग्रामपंचायतीकडून कुठलाही त्रास न होऊ देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल, असे सांगितले. त्यास तक्रारदाराने नकार दिल्याने मोरे याने १० लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत पाच लाखांवर तडजोड झाली. लाचेतील पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये देण्याचे ठरले. त्याप्रमाणे गुरुवारी दुपारी मोरे याच्या घरात पंटर देंगे याने पैसे घेताच त्याला अटक करण्यात आली. नंतर मोरे व लिपीक बोरसे यांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पंकज शिंदे, रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर यांनी केली.