जळगाव मिरर | १७ नोव्हेबर २०२३
गेल्या दोन दिवसापासून सोशल मिडीयावर अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या चाहत्याला मारहाण केलाय्च्या व्हिडीओ व्हायरल होत असतांना आता नाना पाटेकर यांनी माफी देखील मागितली आहे. नाना पाटेकर सध्या अनिल शर्माच्या ‘जर्नी’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेल्फी काढण्याकरिता आलेल्या एका फॅनला नानाने मारून पळवून लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर नानाने एक व्हिडीओ शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. नाना म्हणाले की, या सिनेमात मी डोक्यावर टोपी घातली आहे.
एक व्यक्ती मला म्हाताऱ्या तुझ्या डोक्यावरची टोपी विकायची आहे का?’ असं विचारतो. त्यावर मी त्या व्यक्तीला मारतो आणि पळवून लावतो, असा सीन सिनेमात आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा या दृश्याची रिहर्सल सुरू होती. अचानक एक मुलगा आला आणि सेल्फी काढू लागला. तो कोण आहे हे मला माहीत नव्हतं. मला वाटलं की तो आमच्याच टीममधील असून सीनचाच भाग आहे. त्यामुळे मी त्याच्या डोक्यावर मारलं आणि सीनमधला ‘बदतमीजी मत करो, निकलो यहां से…’ हा डायलॉग म्हणालो. नंतर समजलं की तो आमचा माणूस नव्हता. त्यामुळे मी त्याला बोलवायला जात होतो तेवढ्यात तो पळून गेला. माझ्याकडून चुकून घडलं. तो कुठून आला ते मला माहीत नव्हतं. गैरसमज झाला तर माफ करा.