
जळगाव मिरर | १५ नोव्हेबर २०२३
मराठी असो वा हिंदी चित्रपट नेहमीच आपल्या कलाकारीतून अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेला सुप्रसिद्ध सिनेअभिनेते नाना पाटेकर सध्या एका चित्रपटाच्या शूटिंग स्पॉटवर गेट-अपमध्ये उभे असतांना त्यांनी एका चाहत्याच्या कानशिलात भडकावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा चाहता नाना पाटेकरांच्या एका चित्रपटाच्या सेटवर सेल्फी घेण्यासाठी आला होता. त्याला पाहताच नानांचा पारा एवढा चढला की, त्यांनी थेट त्याच्या श्रीमुखातच भडकावली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हि घटना वाराणसीमध्ये घडली आहे.
नाना पाटेकर दशाश्वमेध रोडवरील आपल्या शूटिंग स्पॉटवर गेट-अपमध्ये उभे होते. तेवढ्यात एक तरुण येऊन त्याच्या शेजारी उभा राहिला आणि सेल्फी काढू लागला. हे पाहून नानांना पारा चढला. त्यांनी त्याला जोरदार थापड मारली. त्यानंतर क्रू मेंबरने त्या तरुणाचा गळा धरून तेथून बाहेर काढले. घटनास्थळी उपस्थित एका व्यक्तीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कैद करून व्हायरल केला. हा व्हिडिओ मंगळवारचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जर्नी चित्रपटाची सुरुवात एका भक्तीगीताने होते. नाना पाटेकर दशाश्वमेध मार्गावर एका दृश्यासाठी उभे होते. शूटिंग स्पॉटभोवती सुरक्षा कर्मचारी उभे होते. या सुरक्षा रक्षकांना चकवा देत हा तरुण नानांपर्यंत पोहोचला होता. हा युवक सुरक्षा दलाचा सदस्य असल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर शूटिंग पुन्हा सुरुळीत सुरू झाले.