जळगाव मिरर | २१ जानेवारी २०२५
अनुसूचित जमातीतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विकास विभागाकडून युनिसेफ आणि सीवायडीए या संस्थांच्या मदतीने आदिसखी (वॉशमित्र) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रशिक्षणानंतर पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधा देखभाल-दुरूस्तीच्या माध्यमातून स्वव्यवसायांची संधी मिळणार असल्याने आदिवासी महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्टया आत्मनिर्भार होणार आहेत.
आदिसखीच्या माध्यमातून आदिवासी महिलांना प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरूस्ती इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आल्याने उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. त्यातून संपूर्ण कुटुंबाला आधार मिळणार आहे. आदिवासी महिलांना यामुळे हक्काचा रोजगार मिळणार असून त्या स्वावलंबी बनणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये प्लंबिंग, इलेक्ट्रिकल, पेंटिंग, सोलर, सुतारकाम, वॉटर फिल्टर दुरूस्ती, रंगकाम इत्यादी देखभाल व दुरूस्ती कामे वारंवार करावी लागतात ही कामे करण्यासाठी वेळोवेळी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासते. अनेकदा मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने संबंधित भौतिक व्यवस्था वापरण्यास मर्यादा येतात त्या पार्श्वभूमीवर आदिसखी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
आदिसखी प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील सुवर्णा साळुंके , सानिया तडवी, असिता बारेला, माला तडवी, योगिता पारधी , अनिता वळवी, मनिता बारेला या 7 आदिवासी महिलांचे पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
आदिसखी महिला ह्या आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थी असल्याने प्रकल्प अधिकारी यांनी सर्वांचे कौतुक केले आहे. प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते महिलांना व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या साहित्य किटचे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहूरे, राजेंद्र लवणे, कार्यालयीन अधिक्षक राकेश अहिरे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास गायकवाड, वॉश मित्र प्रकल्प व्यवस्थापक योगेश पाटील, सीवायडीए सचिव शांताराम बडगुजर, लिपिक दिपक विनंते आदी उपस्थित होते.