
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका व्यक्तीला सहा लाखांना गंडवून फरार असलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी तब्बल ११ वर्षानंतर अटक केली. तो जळगावात येत असल्याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. गोपीकिशन ओमप्रकाश जांगीड (वय 22, रा. रामपुरा, ता. राजगड, जि. चुरू, राजस्थान) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील कमलाकर एकनाथ बडगुजर यांच्याशी सन २०११ मध्ये जांगीड याने ओळख निर्माण केली. यानंतर बडगुजर यांना त्यांच्या कंपनीत डेप्युटी डायरेक्टर पदावर नोकरी लावून देण्याचे आमीष जांगीड याने दिले. त्यासाठी जांगीड यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील मदत केली. वेळोवेळी बडगुजर यांना घरी बोलावून आमिष दाखवले. यानंतर नोकरी लावून देण्यासाठी पैसे लागतील अशी मागणी केली.
काय होता प्रकार ?
२९ जानेवारी २०११ पासून वेळोवेळी बडगुजर यांच्याकडून पैसे घेतले. एकुण सहा लाख रुपये घेतले गेल्यानंतरही नोकरी मिळवून दिली नाही. यानंतर बडगुजर यांनी पैसे परत मागीतले असता जांगीड कुटुंबीय कंपनी बंद करुन निघुन गेले होते. या प्रकरणी बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जांगीड कुटुंबियांविरुद्ध 7 सप्टेबर 2011 रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून जांगीड कुटुंबिय बेपत्ता झाले होते. गोपीकिशन जांगीड हा मंगळवारी जळगाव येणार असल्याची गोपनिय माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, अल्ताफ पठाण, सचिन मुंडे यांच्या पथकाने महाबळ परिसरात सापळा रचला. जांगीड हा महाबळच्या एका नातेवाईकाडे येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. वैद्यकीय तपासणी करुन रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे.




















