जळगाव मिरर / २३ फेब्रुवारी २०२३
देशातील शेतकरी आपल्या कर्जबाजारीपणाला कंटाळून नेहमीच टोकाचे पाऊल उचलत आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथे घडली. आधी पत्नीने आत्महत्या केली होती. त्यानंतर पतीनेही टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील धावडा ( मुर्डेश्वर) इथं ही घटना घडली आहे.
सुरेखा संतोष दळवी आणि संतोष किसन दळवी अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावं आहे. दोन दिवसांपूर्वीच पत्नी सुरेखाने विषारी किटक औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. पत्नीच्या निधनामुळे संतोष दळवी एकटे पडले होते आणि मानसिक तणावात होते. त्यामुळे संतोष यांनी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.
दळवी कुटुंबावर सततची नापिकता, विविध बॅंकेचे कर्ज,अशा आर्थिक विवंचनेतून शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतीत काही पिक येत नव्हते. त्यामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
