जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२६
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि वेदनादायक असल्याची भावना ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने प्रशासनाची उत्तम जाण असलेला, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी नाळ जपणारा नेता गमावला असल्याचे खडसे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले.
अजितदादा पवार यांच्याकडे राज्याचे कणखर नेतृत्व म्हणून पाहिले जात होते. सहकार, शैक्षणिक, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रावर त्यांची भक्कम पकड होती. विकासाची दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली समर्पित कार्यपद्धती हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. आजच्या राजकारणात त्यांच्यासारखा प्रशासनाची सखोल जाण असलेला नेता क्वचितच आढळतो, असे खडसे यांनी म्हटले आहे.
ऐन उमेदीच्या काळात अजितदादांचे अचानक जाणे मनाला चटके लावणारे असून त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा ठसा कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत खडसे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
या दुःखद घटनेमुळे पवार कुटुंबियांवर नियतीने मोठा आघात केला असून या दुःखात आपण व आपला परिवार सहभागी असल्याची भावना एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. परमेश्वर पवार कुटुंबियांना आणि त्यांच्या असंख्य समर्थकांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली.




















