जळगाव मिरर | २० जानेवारी २०२५
राज्यात बदलापूर प्रकरणाची गेल्या काही महिन्यापूर्वी जोरदार चर्चा असतांना आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता.
या एन्काउंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटर प्रकरणात 5 पोलिस जबाबदार असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी एन्काऊंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आता न्यायालायाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.
बदलापुरात एका शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. एका दुसऱ्या प्रकरणात त्याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला. आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिस पथकावर गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अक्षय शिंदे याला ऑगस्ट 2024 मध्ये बदलापूर येथील शाळेच्या शौचालयात दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली होती. तो शाळेत परिचर होता. सप्टेंबरमध्ये तळोजा कारागृहातून चौकशीसाठी नेत असताना वाटेतच पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये चकमकीत शिंदेचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेला अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असल्याचा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या एन्काउंटरची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार चौकशीसाठी एका न्यायालयीन चौकशी समितीची स्थापना केली. या समितीने आज आपला अहवाल सादर केला असून एन्काउंटर प्रकरणी 5 पोलिसांना जबाबदार ठरवले आहे.