
जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२६
मराठा आरक्षण आंदोलक आणि प्रमुख नेते मनोज जरांगे यांच्याबाबत त्यांचे माजी सहकारी अमोल खुणे याने गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मनोज जरांगे यांच्यावर झालेल्या कथित घातपाताच्या प्रयत्न प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या खुणेला नुकतीच जामिनावर सुटका मिळाली असून, सुटकेनंतर त्याने जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात अमोल खुणे याने मनोज जरांगे आणि स्वतःची एसआयटीमार्फत चौकशी तसेच नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. “जरांगे यांच्या आंदोलनातील सर्व बाबी मला माहिती आहेत. योग्य वेळी मी सर्वकाही उघड करेन,” असा इशाराही खुणे याने दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल खुणे याने मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. “कोपर्डी प्रकरणातील आरोपींना मारण्याबाबत मनोज जरांगे यांनी आम्हाला सांगितले होते की, ‘तुम्ही जर त्यांना मारले नाहीत तर मी फाशी घेईन.’ त्यामुळेच आम्ही त्या आरोपींना मारले,” असा दावा खुणे याने केला.
कोपर्डी प्रकरण हे २०१६ मध्ये घडलेले अत्यंत संवेदनशील आणि भीषण प्रकरण असून, त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली होती आणि मराठा आरक्षण आंदोलनाला मोठा वेग मिळाला होता. खुणे याने पुढे म्हटले की, “या प्रकरणात मी शिक्षा भोगलेली आहे, मात्र मनोज जरांगे यांनी कधीही शिक्षा भोगलेली नाही.” या आरोपांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अमोल खुणे याने मनोज जरांगे यांना थेट इशारा देत म्हटले, “जर गुन्हा सिद्ध झाला, तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र, गुन्हा सिद्ध झाला नाही, तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.” जालना पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खुणे याने स्पष्ट केले की, “माझ्यावर जे आरोप झाले आहेत आणि मनोज जरांगे जे आरोप करत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर माझी एकच मागणी आहे—आम्हा दोघांचीही नार्को टेस्ट करण्यात यावी.” तसेच, या प्रकरणात ईडी, सीबीआयसह शक्य त्या सर्व तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही खुणे याने आपल्या निवेदनात केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
या आरोपांनंतर मराठा आंदोलन, त्यामागील नेतृत्व आणि गेल्या काही वर्षांतील घडामोडींवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















