अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी न्यू प्लॉट परिसरात तरुणांच्या झालेल्या हाणामारीमुळे तरुणींच्या नवरात्रोत्सवाच्या आनंदावर विरजण पडल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्रीच्यावेळी भटकणाऱ्या रोडरोमिओंच्या भीतीपोटी पालकवर्ग आपल्या मुलींना गरबा खेळण्यासाठी बाहेर पाठवायला धजावत नाहीत. या प्रकाराबाबत तरुणींसह पालकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे. गरबा खेळणे हा मुलींसह महिलावर्गाला खूप प्रिय आहे. बहुतांश महिला व तरुणी रात्रीच्यावेळी गरबा खेळण्यासाठी बाहेर पडतात. मात्र हीच संधी शोधत रोडरोमिओ देखील दुचाकीद्वारे तरुणींच्या मागावर बाहेर पडून अचकट विचकट प्रकार करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ज्याठिकाणी गरबा खेळले जातात, त्याठिकाणी रात्रीच्या वेळी ट्रिपल सीटवर बसून शहरातील गुंड प्रवृत्तीचे तरुण मद्यपान व नशापान करून हिंडत असतात. विवाहित महिलांचे कुटुंबीयही त्यांना गरबा खेळण्यासाठी मज्जाव करतात. रोडरोमिओंवर पोलिसांनी कठोर कारवाई करत त्यांचा कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.