जळगाव मिरर | ३ मार्च २०२४
शतपावलीसाठी गेलेल्या वृद्धाला मागून भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याची घटना शनिवार दि. २ रोजी चोरवड येथे घडली. या अपघातात साहेबराव धोंडू पाटील (वय ७८) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी चालकाविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील चोरवड येथे साहेबराव पाटील हे वृद्ध वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळच्या सुमारास ते फिरायला निघाले. दरम्यान, चोरवडकडून पारोळाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यामध्ये साहेबराव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुल, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरा पारोळा पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.