जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२५
तुम्हाला शनी आहे असे सांगून हातचलाखी करून तीन मदारींनी वृद्धाच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची अंगठी चोरून नेल्याची घटना दि १८ रोजी साडे अकरा वाजता अमळनेर बसस्थानकावर घडली. अवघ्या काही तासात पोलिसांनी तपास चक्रे फिरवत तीघांना अटक करण्यात आली असुन खाकी दाखवताच त्यांनी अंगठी काढून दिली आहे. दरम्यान यातील एक संशयीत फरार झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील बळवंतराव जयवंतराव वाघ (वय ८६) हे आपल्या जावयाकडे गांधली ता अमळनेर येथे सुभाष रामराव देशमुख यांच्याकडे येण्यासाठी बसस्थानकावर आले. जावयाने बाजार करून येतो तोपर्यंत वृद्धाला बसस्थानकावर थांबायला सांगितले. काही वेळात एक इसम आला आणि त्याने वृद्धाला शेगाव जाणारी बस किती वाजता आहे अशी विचारपूस केली. वृद्धाने कंट्रोल केबिनला विचारा असे सांगितल्यावर दुसरा इसम आला त्याने पहिल्याला विचारले की माझ्या घरात सतत भांडण कटकटी होतात. तेव्हा पहिल्याने त्याला सांगितले की तुला शनी आहे. असे सांगून त्याने खालून खडा उचल आणि बाबांच्या हातात ठेव म्हणून सांगितले.
पहिल्याने वृद्धाला मूठ बंद करायला सांगून मंत्र पुटपुटला आणि वृद्धाच्या हातात रुद्राक्ष तयार झाले. ते रुद्राक्ष पहिल्याने घेऊन दुसऱ्याच्या हातात दिले व त्याला ते देव्हाऱ्यात ठेवायला सांगितले आणि दक्षिणा मागितली. त्यावेळी तिसऱ्या जोडीदाराने त्याला दक्षिणा दिली. पहिल्याने तेव्हा वृद्धाला सांगितले की बाबा तुम्हाला पण शनी आहे तुम्ही पण दक्षिणा द्या. त्यांनतर त्यांनी वृद्धाजवळील २० रुपयांची नोट घेऊन त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेतली. आणि २० रुपयांच्या नोटेत ती अंगठी बंद करून दुसऱ्याला वृद्धाच्या खिशात ठेवायला लावली. वृद्धाला सांगितले की तुमची गाडी लागली आहे तुम्ही मागे न पाहता पुढे जा. अंगठी खिशात राहू द्या शनी निघून जाईल. वृद्ध काही अंतर गेल्यावर भानावर आला त्याने खिश्यात पाहिले असता अंगठी गायब होती. मागे वळून पाहिले तेव्हा ते चारही अनोळखी इसम गायब होते.
सदरची घटना बसस्थानकावरील असलेले पोलीस वाडिले याना कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना कळवण्यात आले. त्यांनी हेडकॉन्स्टेबल संतोष नागरे प्रशांत पाटील, उज्वलकुमार म्हस्के, गणेश पाटील, नितीन कापडणे याना चोराना शोधण्यास पाठवले. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक बाबींवरून चोरटे मोटरसायकलवर पळत असल्याचे समजले. सरळ शिरपूर टोल नाका गाठला. संशयितांच्या मोटारसायकली येताच त्यांच्यावर झडप घातली. पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे खुदबु नाजीर मदारी (वय ३० रा लकडकोट येवला) भैय्या आयुब मदारी (वय २७) व शाहरुख उर्फ शाहरु हसन मदारी (वय २५ दोन्ही रा नगरदेवळा ता पाचोरा) असे सांगितले. त्यातील एक फरार झाला होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणून दिली. आणि आणखी असे बरेच प्रकार केल्याचे सांगितले. तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता ३१८ (४) व ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.