
जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२५
राज्यातील महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही निवडणूक यशाचे प्रमुख कारण ठरल्यानंतर आता ‘लाडकी सुनबाई योजना’ सुरू होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी ठाण्यात या योजनेची घोषणा करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आताच्या घडीला ‘लाडकी सुनबाई’ योजनेसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये दिले जातात. या योजनेच्या यशामुळे महायुतीला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्याचे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर ‘लाडकी सुनबाई’ योजना सुरू होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता.
मात्र, अजित पवार यांनी या चर्चांना खोडून काढले. “सूत्रांच्या नावाखाली खोट्या बातम्या पसरवू नका. आम्ही जे काही ठरवतो, ते कॅबिनेटच्या बैठकीत ठरते आणि पत्रकार परिषदेतून जनतेला कळवले जाते. सध्या ‘लाडकी सुनबाई’ योजनेसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही,” असे पवारांनी ठणकावून सांगितले. तथापि, सरकार नेहमीच जनहिताचे सकारात्मक निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.




















