
जळगाव मिरर । २३ डिसेंबर २०२२
शहरातील उमवि येथील केंद्रीय विद्यालयाचे वार्षिक क्रीडा सम्मेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील यांची उपस्थिती होती. माता सरस्वती व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यात प्राचार्य श्री. मैथ्यू अब्राहम, वरिष्ठ शिक्षक श्री. नितिन आरसे, श्री. जी. एल. अहिरवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी श्री. विनोद पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता खेळ संस्कृति जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राथमिक विभागाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत प्रस्तुत केले. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. पंकज वराडे यांच्या सोबत विद्यार्थ्यांनी खेळ प्रतिज्ञा घेतली. विविध क्रीडा प्रकारात विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडू अंशुमन लोहार, आदित्य दुसाणे, नंदिनी दुसाणे, प्रसाद बाविस्कर, रश्मी कमोद यांनी मशाल आणून क्रीडा ज्योत प्रज्वलित केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी योग प्रस्तुती, झुम्बा नृत्य, एयरोबीक्स प्रस्तुती व लेझीम पथकाद्वारे विविध कार्यक्रम सादर केले. मुलांच्या 17 वर्षाखालील मुलांच्या 100 मी. धावणे ही स्पर्धा घेण्यात आली. तसेच प्राथमिक विभागाक़डून सर्व राज्यांच्या वेशभूषा परिधान करुन भारतीय संस्कृतीचा परिचय करुन दिला. श्री. संतोष पाटील, कु. इंद्रायणी व श्रीमती. अमिता निकम यांनी सूत्रसंचालन केले. तर खेळ शिक्षक श्री. पंकज वराडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.




















