
जळगाव मिरर | १२ मार्च २०२६
भुसावळ शहरातील आगाखानवाडा परिसरात किरकोळ वादातून एका व्यक्तीने लोखंडी पाईप व फायटरने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जखमी व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगरमधील आगाखानवाडा परिसरातील तक्रारदार तैय्यब सुवामान सय्यद (वय ५६) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासोबत पत्नी अफसाना बी, मुलगा रमजान व सुन मिसबाह राहतात. दरम्यान, ९ मार्चला रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा कामावरून घरी येत असताना परिसरातील जावेद शेख उर्फ सुलेमान याने मद्यधुंद अवस्थेत त्याला रस्त्यात अडवून ‘या रस्त्याने जाऊ नकोस, दुसऱ्या रस्त्याने जा’ असे सांगत शिवीगाळ केली. त्या वेळी वाद टाळण्यासाठी मुलगा थोडावेळ थांबून नंतर घरी गेला. यानंतर १० मार्चला सकाळी १० वाजता संशयित जावेद शेख हा तैय्यब सय्यद यांच्या घराबाहेर येऊन मुलगा रमजानला शिवीगाळ करू लागला. या वेळी तैय्यब सय्यद यांनी त्याला रमजान महिन्यात शिवीगाळ करू नको, असे सांगितले. त्यावर संशयिताने त्यांना धमकी देत लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यावर वार केला. दरम्यान, त्यांच्या मुलाने शेख याच्या हातातील पाईप हिसकावून घेतला. त्यानंतर शेख याने खिशातून फायटर काढून त्यांच्यावर पुन्हा हल्ला केला.
या झटापटीत तैय्यब सय्यद यांच्या पत्नीच्या नाकावरही त्याने फायटरने मारहाण केली तसेच मुलाचा गळा दाबल्याने तो जखमी झाला. तर, परिसरातील हकीम खान रहीम खान आणि सैय्यद रियाज सैय्यद उस्मान यांनी मध्यस्थी करून संशयिता आवरले. मात्र, त्याने ठार मारल्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी तक्रारदाराने जावेद शेख हुसेन उर्फ सुलेमान याच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.




















