जळगाव मिरर | २६ फेब्रुवारी २०२५
येथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवरायांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकवणाऱ्या विकृत प्रशांत कोरटकरला अटक करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, काल मध्यरात्री इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर नावाच्या विकृत व्यक्तीने कॉल करून धमकवण्याचा प्रयत्न केला. या कॉलदरम्यान सडक्या मानसिकता असलेल्या कोरटकरने छत्रपती शिवराय, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.
यामध्ये तुझा राजा पळून गेला होता, शिवराय व माँसाहेब जिजाऊंच्या संदर्भात जेम्स लेन या विदेशी लेखकाने लिहिलेल्या पुस्तकातील विकृत इतिहासाचे समर्थन, संभाजी राजेंबद्दल चुकीची माहिती तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना अतिशय घाणेरड्या पद्धतीने शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांच्या राज्यात आहात अशा शब्दांत बोलतांना कोरटकरने भारतीय संविधानाद्वारे स्थापित लोकशाही राज्याच्या संकल्पनेची पायमल्ली केली आहे. या कॉल रेकॉर्डिंग द्वारे कोरटकरने त्याच्या मनुवादी तसेच विकृत संस्कारांचा परिचय दिला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. या विकृत मानसिकता असलेल्या माणसाला तातडीने अटक करून कठोर शासन करण्यात यावे, या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांना दिले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगर अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मयूर चौधरी, कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जिल्हा संघटक गणेश पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्यासह भरत पाटील, चंद्रकांत पाटील, राकेश कोठारी, अविनाश पाटील आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
