
जळगाव मिरर | ५ सप्टेंबर २०२५
चाळीसगाव येथील शिवनेरी प्रकल्पाचे काम करणाऱ्या सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी मुंबई व लक्ष्मी वरद इन्फ्रा. प्रा. लि. या कंपन्यांचे मजुरांचे पगार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी व इतर खर्चासाठी लागणारी सुमारे ४५ लाखांची रोकड, १६ हजारांची हार्डडिस्क आणि ३०० रूपयांचा पेन ड्राईव्ह असा सुमारे ४५ लाख १६ हजार ३०० रूपयांचा ऐवज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयातून चोरीस गेला आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रकल्प संचालकांच्या फिर्यादीवरून चाळीसगावच्या सुनील पंढरीनाथ चौधरी याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मुंबई येथील सुपरि अल्टी बिल्टकॉन एलएलपी या कंपनीचा चाळीसगाव येथील मालेगाव रोडवर शिवनेरी पार्क या नावाने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृह प्रकल्प सुरू आहे. य कंपनीची मालेगाव रोडवर साईट व ऑफिस असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यालय आहे. या प्रकल्पाचे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट लक्ष्मी वरद इन्फ्रा. प्रा.लि. कंपनीस दिले आहे. या दोन्ही कंपन्यांनी दैनदिन व इतर खर्चासाठी रोख रक्कम तसेच शिवनेरी पार्क येथे वास्तव्यास असलेल्या ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने जमा केलेले एकूण ४२ लाख रूपये ३० ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात ठेवले होते. ही रक्कम व काही कागदपत्रे तसेच पेन ड्राईव्ह व हार्डडिस्क गहाळ झाल्याचे समजल्यानंतर प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात सकाळी ७.२६ वाजेच्या सुमारास एक मुलगा वॉचमनकडून चावी व झाडू तसेच वीज बंद करून पिशवी घेऊन आत गेला. तर येताना एक गोणी घेऊन आला. त्यानंतर पिशवीसह गोणी घेऊन तो निघुन गेला. त्यामुळे या पैशांची शहरातील साईनाथ पंढरीनाथ चौधरी याने चोरी केल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. साईनाथ याला कंपनीने कामावरून काढून टाकले. त्याने कंपनीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात सफाईसाठी आल्याचे वॉचमनला खोटे सांगून वॉचमनकडून चावी ही चोरी केली. यात कपाटातील काळ्या पिशवीत ठेवलेले रोख ४५ लाख रूपये, हार्डडिस्क आणि पेन ड्राईव्ह असा ४५ लाख १६ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.




















