
जळगाव मिरर | २३ मार्च २०२६
राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ तसेच आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरोधात नाशिक सायबर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून पोलिसांनी मुख्य आरोपी अशोक खरातला अटक केली आहे. त्याचबरोबर त्याच्या ट्रस्टशी संबंधित असलेल्या रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून काही विकृत मानसिकतेचे लोक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे बनावट आणि अश्लील फोटो तयार करत असल्याचे उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणाशी कोणताही संबंध नसलेल्या निरपराध महिलांचे फोटोही चुकीच्या पद्धतीने वापरले जात आहेत. यामुळे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला मोठा धक्का बसत असून पोलिसांनी या प्रकाराला अत्यंत गंभीरतेने घेतले आहे. सायबर विभागाने सोशल मीडियावरील संशयास्पद पोस्ट्सवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
कायद्यानुसार कोणत्याही लैंगिक अत्याचारातील पीडितेची ओळख उघड करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरीही व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या माध्यमांवर अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. “पीडितांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, सायबर पोलिसांनी विशेष पथक तयार करून सोशल मीडिया मॉनिटरिंग सुरू केले आहे. केवळ आक्षेपार्ह पोस्ट तयार करणारेच नव्हे, तर त्या शेअर किंवा फॉरवर्ड करणारे तसेच अशा ग्रुप्सचे अॅडमिनही पोलिसांच्या रडारवर आहेत. तपासात अडथळा निर्माण करणाऱ्या किंवा प्रकरणाला वेगळे वळण देणाऱ्या कोणत्याही कृतीवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणतीही अप्रमाणित माहिती किंवा फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी विचार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पीडितांची ओळख उघड होईल असे कोणतेही पोस्ट शेअर करणे टाळावे, तसेच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जर कोणाची सोशल मीडियावर बदनामी होत असेल, तर तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




















