
जळगाव मिरर | १२ मार्च २०२६
खासगी वाहनाच्या काचेवर अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह लावण्याप्रकरणी नयना दीपक चौधरी (रा. विठ्ठलपेठ) यांच्याविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उघडकीस आला.
या चारचाकी वाहनावर (एमएच १९, ईजी ७५७८) स्वामी ग्रुप अँड इन्फ्रास्ट्रक्टर प्रोप्रायटर अशा आशयाच्या स्टीकरच्या मध्यभागी अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह असल्याचे आढळून आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या मेल आयडीवर तक्रार करण्यात आली. त्यात खासगी व्यक्ती, संस्था किंवा व्यावसायिक घटकाला खासगी वाहनावर अशा प्रकारे राष्ट्रीय चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार नसल्याचे नमूद केले होते. या प्रकरणी पोहेकॉ भरत चव्हाण यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



















