जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२५
प्रत्येक परिवारात छोटे मोठे वाद नेहमीच होत असतात मात्र परिवारातील काही वाद थेट न्यायालयात पोहचत असल्याच्या अनेक घटना समोर येत असताना आता एक कौटुंबिक प्रकरण मिटवण्यासाठी कोर्टाची पायरी चढलेल्या सासू -सुनेने न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच एकमेकींवर हात साफ केल्याची घटना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, या प्रकरणातील सासू -सुनेमध्ये अजिबात जमत नव्हते. त्यामु्ळे हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले होते. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी या दोघीही आपल्या कुटुंबीयांसह नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात आल्या होत्या. पण न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच सासू यमुनाबाई निकम (58) व सुनेचा भाऊ दीपक साळवे यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर पाहता पाहता त्यांच्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.
या घटनेत दोन्ही गटाचे महिला व पुरुष एकमेकांना भिडले. कोर्टाच्या प्रवेशद्वारावरच सुरू असणारी ही हाणामारी पाहता तिथे उपस्थित काही लोकांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही बाजूचे लोक एवढे आक्रमक होते की, ते मध्यस्थी करणाऱ्यांनाही जुमानत नव्हते. अखेर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत, त्यांना पोलिस ठाण्यात नेले. या प्रकरणी दोन्ही कुटुंबीयांवर कोर्ट परिसरात हुज्जत घातल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना मेडिकल मेमोही बजावण्यात आला आहे. कोर्ट परिसरात घडलेल्या या घटनेची दिवसभर खमंग चर्चा सुरू होती.
उल्लेखनीय बाब म्हणजे सासू, सुनेच्या नात्यात वाद होणे ही सामान्य बाब असल्याचे सुज्ञ लोक सांगतात. पण सामान्य वाटणारा हा वाद किती विकोपाला जाऊ शकतो, याची प्रचिती देणारी ही घटना साक्षात कोर्टात परिसरातच घडली आहे. पेशीनिमित्त एकमेकींपुढे आलेल्या सासू-सुनेत शाब्दिक बाचाबाचीतून अशी तुफान हाणामारी झाली की, आपण कुठे वाद घालत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. अखेर पोलिसांनाच या वादात उडी घालून दोघींवर कारवाई करावी लागली.