जळगाव मिरर / ९ फेब्रुवारी २०२३ ।
चाळीसगाव शहरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर चॉपरने हल्ला चढवून गंभीर दुखापत केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे वाजता हरगीरबाबा नगरात घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील हरगीरबाबा नगरातील दिनेश शिवाजी कोर (वय २१) हा मनोज लोटन भोई व हर्षल दीपक झोडगे या मित्रांसोबत पीर मुसा कादरी बाबा यांच्या उरुसाकडे जात होता. हरगीरबाबा नगर पाटणारोड येथून जात असताना कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी हे मोटारसायकलवरून आले. तेव्हा कन्हैयाने माझ्याकडे काय बघत आहे. असे सांगून शिवीगाळ केली. त्यात मनोज लोटन भोई याने त्याला शिवीगाळ करू नको, असे सांगितले. मात्र याचाच राग येऊन कन्हैया उर्फ कनू देशमुख व शुभम बारी या दोघांनी मनोज लोटन भोई यांच्या हातावर, गळ्यावर व पोटावर चॉपरने वार करून त्याला गंभीर दुखापत केली. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दिनेश शिवाजी कोर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला कन्हैया उर्फ कनू देशमुख (३०) व शुभम बारी (२८) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




















