जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२५
राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच असून मुंबई, पूण्यानंतर जळगाव जिल्ह्याचा नंबर या अप्रिय घटनेत आला आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत, त्यात प्राणांतिक अपघातात दुचाकी चालकांचे अपघात जास्त असतात. रस्ते अपघात टाळणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ‘सन्मान कर्तृत्वाचा नव्हे दातृत्वाचा’मध्ये ते बोलत होते. यावेळी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या पत्रकार, पोलीस, डॉक्टर, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. बुधवार दि.२२ जानेवारी रोजी मानराज पार्क याठिकाणी सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी हे होते तर प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर ढेरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प प्रमुख राहुल पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे, मोटर वाहन निरीक्षक विनोद चौधरी, सौरभ पाटील, सुयोग माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.महेश्वर रेड्डी म्हणाले की, वाहतुकीचे नियम पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. केवळ जनजागृती करुन रस्ते अपघात थांबणार नाहीत तर त्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे महत्वाचे आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बहुतांश अपघातात दुचाकीस्वार ठार होण्याचे प्रमाण अधिक आहे.
रोज वेगवेगळ्या रस्त्यांवर अपघात नित्याचे झालेले आहे. वाहतूक नियम व कायदे पाळले तर अपघातांची मालिका खंडीत होण्यास मदत होणार आहे. समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्दात्य भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागडे, मोटर वाहन निरीक्षक विनोद चौधरी, पत्रकार शुभदा नेवे, अभिजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन तुषार वाघुळदे यांनी केले.