जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय मुंबई, तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६” च्या कलम ३९ अन्वये दिव्यांगांसाठी संवेदनशीलता जागृती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज छत्रपती शाहू महाराज सभागृह, जिल्हा परिषद जळगाव येथे करण्यात आले.
.
कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, जिल्हा दिव्यांग समन्वय अधिकारी बी. एस. अकलाडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सतीश धस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायकर, शिक्षणाधिकारी (प्रा.) सचिन परदेशी, डॉ. आकाश चौधरी तसेच नाशिक विभागाचे विधी अधिकारी संतोष सरकटे आणि पुणे येथील विशेष वक्ते नंदकुमार फुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी सरस्वतीमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा दिव्यांग समन्वय अधिकारी श्री. अकलाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना दिव्यांग हक्क अधिनियमातील तरतुदी, विविध शासकीय योजना, तसेच जिल्ह्यातील दिव्यांग सेवांची माहिती दिली.
मुख्य वक्त्यांमध्ये आर. एस. लोखंडे यांनी शासनातील ४ टक्के आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन केले; श्री. परदेशी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण आणि ‘समग्र शिक्षण अभियान’ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती दिली; तर डॉ. आकाश चौधरी यांनी UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया व आरोग्यविषयक योजनांवर प्रकाश टाकला.
नाशिक येथील विधी अधिकारी संतोष सरकटे यांनी दिव्यांग कायदे (१९९२ ते RPWD २०१६) यांची सविस्तर माहिती दिली. मुख्य वक्ते नंदकुमार फुले यांनी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदी, २१ प्रकारच्या दिव्यांगत्वांचे स्पष्टीकरण, तसेच निरामय आरोग्य विमा आणि कायदेशीर पालकत्व योजनांविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, तसेच विशेष शाळांचे शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचा समारोप जिल्हा दिव्यांग समन्वय अधिकारी बी. एस. अकलाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून केला