
जळगाव : प्रतिनिधी
माहेश्वरी विद्याप्रसारक संस्थेच्या अभिनव माध्यमिक शाळेत (जळगाव) गणेशोत्सवासाठी गणपतीची मूर्ती भेट देणारा विद्यार्थी आयन मझहर खान पठाण याचे आणि त्याच्या कुटुंबाचे कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी केले. त्यांनी शाळेत जाऊन गणपतीची आरती केली.
शालेय उत्सवात लोकसहभाग आणि धर्मापलिकडे जाण्याचा पायंडा अभिनव विद्यालयाने सुरू केला आहे. याची दखल श्री. मुंडे यांनी घेतली. आज गणपतीची आरती करण्यासाठी श्री. मुंडे शाळेत गेले. तेथे आयन, त्याचे पालक यांचे श्री, मुंडे यांनी कौतुक केले. नववीच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा मोदक प्रसाद म्हणून दिला.
यावेळी श्री. मुंडे म्हणाले, “अभिनव शाळा ही अनेक वेगवेगळ्या वृक्षांची वनराई आहे. अशा वातावरणात नेहमी प्रसन्नता असते. एकाच प्रकारची झाडे मनाला रूक्ष वाटतात. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती भेट देण्याचा आयान खानची कृती निश्चित सकारात्मक व आदर्श आहे. शाळेने त्या मूर्तीची स्थापना करणे ही घटनाही समाजाला वेगळीदृष्टी देणारी असून समाजाला तसेच सर्व देशाला राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रेरणा देणारा आहे” अशा शब्दात श्री. मुंडे यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधला .
माहेश्वरी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष संजय बिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोद बियाणी यांनी श्री. मुंडे यांचे स्वागत केले. मुख्याध्यापिका सौ. सरोज दिलीप तिवारी, मुख्याध्यापक हेमंत पाटील यांनी कार्यक्रम संयोजन केले.




















