जळगाव मिरर | २३ जुलै २०२५
जळगाव जिल्ह्यात ‘बालिका पंचायत’ या अभिनव उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असून, या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालिकांच्या नेतृत्वगुणांना नवीन दिशा मिळत आहे. या उपक्रमामुळे मुलींना निर्णय प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभाग मिळत असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे.
‘बालिका पंचायत’ उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट मुलींच्या नेतृत्व क्षमतेला बळकटी देणे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे, तसेच शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व बालहक्कांबाबत जनजागृती करणे हे आहे. लहान वयातच निर्णयक्षम व जबाबदार नागरिक घडविण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे आहे.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील विविध भागांतील बालिकांनी पंचायत बैठकीत सक्रिय सहभाग घेतला असून समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी ठाम मत मांडले आहे. नेतृत्व व संवादकौशल्य विकसित करणारा हा उपक्रम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये प्रेरणादायी ठरत आहे. जिल्हा प्रशासनाने या उपक्रमाच्या माध्यमातून ‘सबला बालिका – सक्षम समाज’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिले असून मुलींच्या हक्क, सशक्तीकरण आणि सामाजिक सहभागाला नवे उभारी दिली आहे.
