
जळगाव मिरर | २१ मार्च २०२५
राज्यातील पुणे शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच दोन दिवसापूर्वी हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाला सोमवारी आग लागून चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर सुदैवाने ८ जण बचावले होते. वाहनात शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली असल्याचा प्राथमिक संशय होता. पण पोलिसांनी अधिक चौकशी केली असता टेम्पोच्या चालकानेच ही गाडी पेटवून दिल्याचे उघडकीस आले आहे. पगार कपात केल्याचा राग व कर्मचाऱ्यांशी असलेल्या अंतर्गत वादातून आपण हा गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनार्दन हंबर्डीकर (५६, रा. कोथरूड) असे आरोपी चालकाचे नाव आहे. हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरवर तो काम करतो. बुधवारी सकाळी विप्रो सर्कल फेज एकच्या परिसरात अचानक या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला, तर सहा कामगार भाजले, तर चालक व इतर चार कर्मचाऱ्यांनी गाडीतून उड्या घेत जीव वाचवला. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात जनार्दन हंबर्डीकर यानेच कर्मचाऱ्यांशी असलेल्या वादाच्या रागातून व कंपनीवर असलेल्या नाराजीतून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलिस म्हणाले.
जनार्दन हंबर्डीकर याचे काही कर्मचाऱ्यांशी वाद होते. तसेच दिवाळीत कंपनीने त्याचा पगारही कापला होता. याचा राग हंबर्डीकर याच्या डोक्यात होता. त्याने व्योम ग्राफिक्स कंपनीतूनच मंगळवारी (१८ मार्च) एक लिटर बेंजिम सोल्युशन नावाचे केमिकल एक प्लास्टिकच्या बाटलीत भरून गाडीत आणून ठेवले. तसेच कापडाच्या चिंध्या सीटखाली ठेवल्या. बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी गेले असता वारजे येथे एक काडीपेटी विकत घेतली. कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना हिंजवडी फेज वन परिसरात गाडी येताच आरोपीने गाडीचा ब्रेक दाबला. काडीपेटीची काडी पेटवून कापडाच्या चिंध्यांना आग लावली. केमिकलमुळे काही वेळातच आगीचा भडका उडाला. चालकाने तातडीने गाडीतून बाहेर उडी मारली.