जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२४
पालघर तालुक्यातील वरवाडा येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने इयत्ता १० वीत शिकणाऱ्या मुलींसोबत गैरवर्तन केल्याची तक्रार मुलींनी आणि पालकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांच्याकडे दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरवाडा शासकीय आश्रमशाळेत इयत्ता १० वीत परिसरातील गावांतील एकूण ७६ मुली शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १९ मुलींनी तक्रार अर्ज प्रकल्पात केला आहे.इयत्ता १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी परीक्षा संपल्यानंतर घरी गेल्यावर आपल्या पालकांना मुख्याध्यापक गैरवर्तन करीत असल्याचे सांगितले. यानंतर पालकांसोबत मुलींनी प्रकल्पात तक्रार केली. दरम्यान, मुख्याध्यापक अशोक पवार यांनी आरोपाचे खंडन केले आहे. डहाणू प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक तसेच पाच सदस्यीय महिला चौकशी समितीने गुरुवारी दुपारी आश्रमशाळेला भेट देऊन शिक्षक तसेच मुलींची चौकशी केली.