जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२४
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून जवळ असलेल्या फुलगाव येथे मोकाट कुत्र्यांनी सद्यस्थितीत शहर व प्रत्येक गाव परिसर धुमाकुळ घातला आहे. अशातच एका पिसाळलेल्या कुत्र्याने एका युवकासह दोघांना चावा घेतला होता. या युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, त्यानंतरही युवकाची मृत्युशी झुंज मंगळवारी अपयशी ठरल्याने गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलगाव येथे २२ ऑगष्टला एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने भल्या पहाटे फुलगाव उड्डाण पुलालगत चौहान बुट हाऊससमोर झोपलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाच्या तोंडावर चावा घेवून जखमी केले होते. यानंतर मोकाट कुत्र्याने आपला मोर्चा फुलगावकडे वळवला. या पिसाळलेल्या कुत्र्याला हाकलून लावत असताना कुत्र्याने गणेश देवराम सोनवणे (वय ३०) या युवकाला चावा घेतला होता. त्यामुळे गणेश सोनवणे यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.
तेथील एका दिवसाच्या उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला घरी जावून काही औषधोपचार घेण्याचा जाण्याचा सल्ला दिला. मात्र, १८ दिवसानंतर गणेश सोनवणेला सोमवारी रात्री अचानक त्रास होवू लागला. त्यामुळे त्यांना पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, त्याठिकाणी गणेशची मृत्युशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. तर १० सप्टेंबर रोजी त्यंचा मृत्यू झाला. यामुळे फुलगावात मोकाट श्वानांबाबत मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावात असलेल्या श्वानांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. मयत गणेश यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. सर्वसाधारण कुटुंबातील मनमिळावू कर्ता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या मोकाट पिसाळलेल्या श्वानाने तीन नागरिकांसह गावातीलच एका बकरी व म्हशीलाही चावा घेतला होता. या चाव्यामुळे बकरीसह म्हशीचाही मृत्यू झाल्याने जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी यानिमित्त वरणगावसह परिसरातून होत आहे.