जळगाव मिरर | ३१ मार्च २०२५
गेल्या काहीं महिन्यापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच आता बीडमध्ये आणखी एका देशमुखाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्निल उर्फ बबलू देशमुख असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील कान्हापूर गावात ही घटना घडली आहे. जुन्या वादातून नवरा-बायकोने या तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने बीड जिल्हा पु्न्हा हादरला आहे.
स्वप्नील देशमुख या तरुणावर संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख या दोघांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी स्वप्निल उर्फ बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातीलच किराणा दुकानदार अविनाश देशमुख या तरुणाने मार्च 2023 मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी स्वप्नील देशमुखवर 306, 504, 506, 34 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील देशमुख हा अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुखवर सतत दबाव टाकत होता.
या रागातूनच अविनाश देशमुखचा भाऊ संतोष देशमुख आणि भावजयी सोनाली देशमुख यांनी स्वप्नील देशमुखवर जीवघेणा हल्ला करत त्याची हत्या केली आणि भावाच्या हत्येचा बदला घेतला. या हल्ल्यादरम्यान संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीवर वार करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, स्वप्नील देशमुखची हत्या केल्यानंतर आरोपी संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख हे स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.