अमळनेर : विक्की उत्तम जाधव
जळगाव जिल्ह्यातील सन २०२२-२३ या वर्षातील केळी व इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक स्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या महसुली मंडलांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे, अशा महसूली मंडलांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यात सन २०२२-२३ या वर्षातील केळी व इतर खरीप पिकांच्या पीक विम्याबाबत मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते.’ या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षांमध्ये ७७,८६० शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज दाखल केले होते. त्यामधून ८२, ५१० हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. त्यापैकी केवळ ४६ हजार ९४९ अर्जांची तपासणी करण्यात आली होती. तसेच या कालावधीतील पीक स्थितीचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मागवून घेऊन फेरपडताळणी करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले.
यावेळी मंत्री पाटील व मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक खंड दिला असल्याने पीक विम्याची २५ टक्के रक्कम अग्रीम देण्याची मागणी केली. यावर मुंडे यांनी याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून दसरा ते दिवाळीदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम रक्कम जमा होईल, असे सांगितले.