
जळगाव मिरर | २७ ऑगस्ट २०२५
यावल शहराबाहेर चोपडा रस्त्यावर वन विभागाच्या कार्यालयासमोर ४ किलो गांजा नेतांना दोघांना पकडण्यात आले. या दोघांनी वाघझिरा येथून हा गांजा आणल्याची कबुली दिली असून पोलिसांना या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील वाघझिरा येथून गांजाची खरेदी करून दोन जण भुसावळकडे जात असल्याची गोपनिय माहिती फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर, यावलचे पो.नि. रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, उपनिरीक्षक एम. जे. शेख, हवालदार अर्शद गवळी, अमित तडवी, वासुदेव मराठे यांच्या पथकास यावल ते चोपडा मार्गावर सापळा लावण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार २५ ऑगस्टला ११ वाजेच्या सुमारास वाघझिरा गावाकडून दुचाकी (एमएच- १९, ४११६) ने भुसावळ येथील मुस्लीम कॉलनीतील युसूफ शहा मुलजार शहा आणि भुसावळच्या गरीब नवाज भागातील युनूस सुलतान शेख (मूळ रा. मिठी खाडी निंबायत, सुरत, गुजरात) या दोघांना पथकाने शहराबाहेर वन विभागाच्या कार्यालयासमोर पकडले. त्यांच्याकडून ४ किलो ६० ग्रॅम गांजा जप्त केला. तर गांजासह इतर साहित्य असा एकुण १ लाख ९०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांनी हा गांजा त्यांनी वाघझिरा येथून भामसिंग पुट्या बारेला यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे, हेड कॉन्स्टेबल रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल वसीम तडवी करत आहेत.




















