जळगाव मिरर | १४ जुलै २०२३
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी शरद पवारांना धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यावर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घ्यायला १० दिवस उलटल्यावर आज खाते वाटप झाले असून यात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.
यात अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्रालय, तर दिलीप वळसे पाटील यांना सहकार खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल, पशू संवर्धन खाते देण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या जबाबदारी देण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खाते कायम ठेवण्यात आले आहे. तर अमलनेरचे आ.अनिल भाईदास पाटील यांच्याकडे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन खाते देण्यात आले आहे.
राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.