
जळगाव मिरर | १२ मार्च २०२६
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच मुंबईतील विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विधानभवन परिसरात सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रीय झाली आहे. पोलिसांनी तत्काळ कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांना सुरक्षितपणे इमारतीबाहेर काढले, तसेच प्रवेश तात्पुरता बंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकी सकाळी ई-मेलद्वारे आल्यावर सर्व केबिन, हॉल आणि परिसरातील प्रवेशद्वारांची तपासणी सुरू करण्यात आली. संशयास्पद वस्तू आहेत का, यासाठी बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्कॉड तैनात करण्यात आले आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांचे प्रवेश पास बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी सर्व अधिकारी आणि पोलिसांना कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन ही राज्यासाठी महत्त्वपूर्ण घटना असून यामध्ये राज्याचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो आणि त्यावर चर्चा होते. धमकी आल्यामुळे अधिवेशन सुरू होण्याआधीच परिसरात उच्च सतर्कता राखण्यात आली आहे.
संपूर्ण विधानभवन परिसरात पोलिसांचे पथक फिरत असून, प्रत्येक खोली आणि हॉलची सविस्तर तपासणी केली जात आहे. अधिकारी म्हणतात की ही धमकी चुकीची असण्याची शक्यता असून कोणतीही वास्तविक धोकादायक घटना आढळली नाही. मात्र, नागरिक आणि कर्मचारी सतर्क राहावेत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे मुंबईतील विधानभवन परिसरात चिंतेचे वातावरण आहे, तर सुरक्षा यंत्रणा संपूर्ण प्रदेशात सतर्क ठेवण्यात आली आहे.




















