जळगाव मिरर । ८ ऑक्टोबर २०२५
बॅालिवूडचा अभिनेता शाहरुख खान नेहमीच विविध विषयामुळे चर्चेत येत असताना आता पुन्हा एकदा अभिनेता खान व त्याचा मुलगा आर्यन चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमावर स्ट्रीमिंग होत असलेल्या बॅड्स अॅाफ बॅालिवूड या वेबसिरीजची जोरदार चर्चा होत आहे. मात्र, दुसरीकडे या सिरीजमधील एका सीनमुळे शाहरुखला मोठा झटका बसला आहे. त्याच्या रेड चीलीज या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. त्यानुसार अभिनेता शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट, नेटफ्लिक्ससह इतर कंपन्यांनाही कोर्टाने समन्स बजावले आहे. यामुळे आता शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांची अडचण वाढणार असल्याची चर्चा होत आहे. समीर वानखेडे यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत बॅड्स अॅाफ बॅालिवूड या वेबसिरीजमध्ये त्यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आली असल्याचे म्हटले आहे. आपली प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखविली गेली. यामुळे तपास यंत्रणेच्या मनोबलावर परिणाम होईल, असं समीर वानखेडे यांनी याचिकेत म्हटलं आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने वानखेडे यांनी दाखल केलेली याचिका स्वीकारली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० अॅाक्टोबर या दिवशी पार पडणार आहे. त्यामुळे न्यायालयाने नोटीस बजावलेल्या कंपन्यांनी सात दिवसांच्या आत त्यांचे उत्तर द्यावे लागणार आहे. यामुळे आता या प्रकरणाच्या पुढच्या सुनावणीत कोर्ट कोणता आदेश देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.




















