
जळगाव मिरर | ९ मार्च २०२६
कृषी उत्पन्न बाजार समितीतील राजकीय घडामोडींना रविवारी मोठे वळण मिळाले. बाजार समितीचे चार संचालक यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे बाजार समितीतील राजकीय समीकरणे बदलली असून आता समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत झाले आहे.
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संचालकांमध्ये माजी सभापती लक्ष्मण पाटील, माजी उपसभापती राजू पाटील, संदीप पाटील आणि दिलीप पाटील यांचा समावेश आहे. नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात या सर्वांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश जाहीर केला. यावेळी बाजार समितीचे सभापती सुनील महाजन हे देखील उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे बाजार समितीतील सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. आतापर्यंत समितीत वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेले सदस्य होते; मात्र चार संचालक भाजपमध्ये आल्याने आता भाजपचे स्पष्ट बहुमत निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात समितीतील निर्णयप्रक्रियेवर भाजपचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमात बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नव्याने पक्षात आलेल्या संचालकांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिक प्रभावी काम केले जाईल. तसेच विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणातही चर्चेला उधाण आले आहे. बाजार समितीतील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आगामी निवडणुका आणि स्थानिक राजकीय रणनीतीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.




















