जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२५
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीची स्थानिक निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु असताना आता महायुती सरकारमधील उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेपेक्षा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका या खऱ्या अर्थाने नेत्याची कसोटी पाहणाऱ्या असतात. लोकशाहीतील या निवडणुका सर्वात महत्त्वाच्या आहेत.
आज (4 ऑक्टोबर) भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाचा संभाव्य प्लॅन उलगडला. ते म्हणाले, कदाचित आज संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते. माझ्या 40 वर्षांच्या अनुभवावरून सांगतो, दिवाळीनंतर दोनच दिवसांत आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आता निवडणुकीच्या तयारीला लागा.
चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, निवडणूक ही फास्ट ट्रेनसारखी आहे, प्लॅटफॉर्मवर जो उभा राहील, तो मागे राहील. पण नाराज होऊ नका, राजकारणात प्रयत्न आणि नशीब दोन्ही महत्त्वाचे असतात. 2019 मध्ये ज्यांचे तिकीट नाकारले गेले, त्यापैकी बावनकुळे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याची जबाबदारी मिळाली, याचा दाखला देत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले.
ते पुढे म्हणाले, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मोठा फरक दिसला पाहिजे. 2017 ची परिस्थिती बदला. यंदाच्या दिवाळीचा फायदा घ्या, लोकांशी संपर्क वाढवा. महायुतीच्या बॅनरखाली निवडणूक लढवली जाईल, पण अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेतील, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ज्या जागा मागत आहेत, तिथे आपला उमेदवार सक्षम असेल तर मैत्रीपूर्ण लढत होईल, पण कार्यकर्त्यांचा बळी जाणार नाही, असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.
2019 च्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी समजूतदारपणा दाखवला असता, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करावी लागली नसती. पण नियतीने वेगळा खेळ खेळला. ठाकरेंनी सत्तेसाठी सगळं केलं, पण त्यांना काय मिळालं? राजकारणात उतू नको, मातू नको, पण पक्षासाठी काम करत राहा. मी कधीच कोणतेही तिकीट मागितले नाही. नेत्याची इच्छा ही कार्यकर्त्यांसाठी आज्ञा असते. निवडणुका येतात-जातात, पण पक्षासाठी निष्ठेने काम करत राहावे लागते, असं पाटील म्हणाले.
निवडणूक तयारीला गती
पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. “दिवाळीचा फायदा घ्या, लोकांशी संपर्क वाढवा आणि महायुतीच्या विजयासाठी झटून काम करा,” असे सांगत त्यांनी मेळाव्यात उत्साह निर्माण केला. आता सर्वांचे लक्ष निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लागले आहे, तर महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.




















