जळगाव मिरर | ६ जुलै २०२३
भाजपच्या सत्तेत राष्ट्रवादीचे अजित पवार यांना वाटा दिल्यावर भाजपमधील अनेक नेत्यासह आमदार नाराज असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता भाजपात नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्या देखील चर्चा रंगत आहेत. त्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. नुकतेच त्यांचे राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे हे भाजपसोबत सरकारमध्ये सामिल झाल्यानं आता समिकरण बदलणार आहेत. त्यामुळं पंकजा मुंडे आता काँग्रेसमध्ये एन्ट्री करणार असल्याचं जोरदार चर्चा आहे. या चर्चेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
गुरुवारी पत्रकार परिषदेत पटोले यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतल्याची चर्चा आहे. सोनिया गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची पंकजांनी भेट घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं पंकजा या काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात. यावर प्रतिक्रिया देताना पटोले म्हणाले, “जर त्यांची भेट झाली असेल आणि काँग्रेसमध्ये येण्यास त्या उत्सुक असतील तर त्यांचं स्वागत आहे” म्हणजेच पटोलेंनी देखील पंकजा मुंडे यांचं काँग्रेसमध्ये स्वागत असल्याचं म्हटलं आहे. एकूणच राज्यातील राजकारणाची एकूण स्थिती पाहता काँग्रेस पंकजा मुंडे जर काँग्रेसमध्ये सहभागी होणार असतील तर त्यांना चांगली संधी दिली जाईल, असंही बोललं जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पाडून अजितदादा सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडे हे देखील आले असून त्यांना मंत्रिपदही देण्यात आलं आहे. त्यामुळं वारंवार भाजपनं डावलल्यानं आणि आता पुढील विधानसभेसाठी पंकजा मुंडेंना तिकीटही मिळणार नसल्याची चर्चा असल्यानं त्या येत्या काळात भाजप सोडतील असं बोललं जात आहे.