
जळगाव मिरर । ४ फेब्रुवारी २०२३।
चोपडा शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात एकूण ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील ३६ तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर ९ महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चोपडा शहरात मोठी कारवाई झाल्याने तालुक्यात दिवसभर चर्चा सुरु होत्या.
मिळालेली माहिती अशी कि, चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरीत्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कृषिकेश रावले यांच्यासह पथकाने दुपारी २ वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यात जिल्ह्यातील तसेच परराज्यातील ४३ तरुणी आढळून आल्या आहेत, यातील ३६ महिलांना जळगाव महिला सुधारगृहात पाठविण्यात आले तर कुंटणखाना चालविणाऱ्या ९ महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे यांच्यासह पोलिस कर्मचारी यांचा समावेश होता.




















