जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२५
गेल्या काही दिवसापासून राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि त्यामुळे मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह इतर भागांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य परीक्षा मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बारावी परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2025 होती. मात्र, पूरग्रस्त भागातील अनेक विद्यार्थी आणि पालकांनी अर्ज भरण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली होती. या विनंतीची तातडीने दखल घेत एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तात्काळ राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, शिक्षण विभागाने बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 20 ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत लवकरच परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यासोबतच, बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबर पर्यंत, तर नवीन परीक्षा केंद्रांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे पूर आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.