जळगाव मिरर | २७ मार्च २०२५
गेल्या चार ते पाच महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख हत्याप्रकरणी अनेक घडामोडी घडून गेली असतांना आता या हत्याप्रकरणाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद केला. यावेळी उज्ज्वल निकम यांनी हत्या प्रकरणात सुरुवातपासून नेमकं काय घडलं आणि कोणत्या आरोपीचा काय रोल आहे, याची सविस्तर माहिती कोर्टासमोर मांडली. त्यानंतर आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड गँगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्याप्रकरणात आपला सहभाग असल्याचे नाकारत होता. मात्र, पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडीओ दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलायला लागला. सुदर्शन घुले याने, ‘होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला’, अशी कबुली पोलिसांना दिली आहे.
आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनता होता. तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता.
त्यामुळे आम्ही 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली. तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडीओ शुट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत.