जळगाव मिरर | २९ ऑक्टोबर २०२३
भरधाव बस चालकाने दिलेल्या धडकेत निंबा भिवसन कोळी (वय ६०, रा. गुढे ता. भडगाव) हे वृद्ध जागीच ठार झाले. ही घटना कजगावाजवळील पारोळा चौफुलीजवळ शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गुढे येथील निंबा कोळी हे वृद्ध प्रसाद रविंद्र चौधरी (वय १६, रा. पिलखोड ता. चाळीसगाव) याला सोबत घेवून (एमएच १९ ऐएफ ३१२८) क्रमांकाच्या दुचाकीने गोंडगावकडून कजगावकडे येत होते. तर कजगावकडून भडगावकडे जात असलेली पुणे एरंडोल येथील (एमएच २० बीएल २६५२) क्रमांकाची बसने दुचाकीस्वाराला पारोळा चौफुलीजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर झाले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेतून जखमींना चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
मात्र निंबा कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. तर दुचाकीवरील जखमी असलेल्या प्रसाद चौधरी याची प्रकृती चिंजानक आहे. या अपघातामुळे पारोळा चौफुलीवर काही काळ वाहतूकीची कोंडी झाली होती. याप्रकरणी पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.