
मेहुणबारे : प्रतिनिधी
रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. या अज्ञात वाहनाने त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीसही धडक दिली. त्यात एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील पिलखोडजवळ घडली.
चाळीसगाव तालुक्यातील शिरसगाव येथील रवींद्र राजाराम कोळी (वय ४०, ह.मु. खुलताबाद, जि. औरंगाबाद) हे दुचाकीने (एमएच २०, ईएन ७०५४) जात असताना शुक्रवारी (ता.३०) रात्री नऊच्या सुमारास चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर पिलखोडजवळ हॉटेल रणांगणाच्या पुढे पाटचारीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात रवींद्र कोळी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याचवेळी या अज्ञात वाहनाने रस्त्याने चालणाऱ्या एका बैलगाडीला देखील धडक दिली.
त्यात एक बैल जागीच मृत्युमुखी पडला. या अपघातप्रकरणी सतीश कोळी (रा. शिरसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार मोहन सोनवणे तपास करीत आहेत.




















