जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२५
कपडे विक्रीसाठी आसोदा येथे जात असताना भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे नंद साबणदास जगिया (वय ६८, रा. भुसावळ) हे जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास बायपासजवळील असोदा सर्व्हिसरोडवर घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील सिंधी कॉलनीत नंद जगिया यांचा कापड व्यवसाय असून ते गावोगावी बाजारात जाऊन कापड विक्री करायचे. शनिवारी ते आसोदा येथे कापड विक्रीसाठी येत असताना बायपासवरून आसोदा सव्र्व्हस रोडने जात असताना त्यांना मालवाहू वाहनाने धडक दिली. यामधे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोहेकॉ प्रदीप राजपूत, प्रकाश चिंचोरे, सोपान पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जगिया यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषित केले.
बायपासवर झालेल्या अपघात झाल्याचा व्हिडिओ काही नागरिकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर केला. यावेळी भुसावळ येथे राहणारे मयताचे पुतणे विशाल अमरलाल जगिया (वय २३, रा. भुसावळ) यांनी तो पाहिला. त्या वेळी त्यांना काकाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजले. भुसावळ येथे राहणाऱ्या कुटुंबियांनी तात्काळ जळगावला येत मयत नंद जगिया यांची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















