
जळगाव मिरर । ८ डिसेंबर २०२२
गुजरातमधील सर्व 182 विधानसभा जागांचे कल समोर आले आहेत. समोर आलेल्या कलांनुसार, भाजपनं बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप सध्या 147 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये काँग्रेसची दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे. कलांनुसार, काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे. तसेच, गुजरातमध्ये पहिल्यांदाच सर्व जागा लढवणारा आम आदमी पक्षही 10 जागांवर आघाडीवर आहे, तर 4 जागांवर इतर पक्ष, अपक्ष आघाडीवर आहेत.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या. आकडेवारीनुसार, यावेळी भाजपला 48 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची पूर्णपणे वाताहात झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं 2017 मध्ये विधानसभेच्या 77 जागांवर विजय मिळवला होता, मात्र यावेळी काँग्रेस केवळ 21 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 57 जागांचे नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
यंदा भाजप विक्रम रचणार
गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. यापूर्वी 2002 मध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला होता. 2002 च्या निवडणुकीत भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. तर, यावेळी हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे भाजप 2002 मधील स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.





















