जळगाव मिरर | १५ ऑक्टोबर २०२५
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पुन्हा एकदा भाजप हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनल्याचा आरोप केला. स्वाती पाचुंदकर व त्यांचे पती दत्तात्रय पाचुंदकर यांचा काल भाजपमध्ये प्रवेश झाला. या दोघांवरही भूखंड हडप केल्याप्रकरणी हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे भाजप हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान असल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट होते, असे त्या म्हणाल्यात.
सुषमा अंधारे आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या, काल रांजणगावच्या स्वाती पाचुंदकर आणि दत्तात्रय पाचुंदकर यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. या दांपत्याने केलेले जमीनघोटाळे यावर एक संपूर्ण वेब सिरीज निघू शकेल. या दाम्पत्यावर रांजणगावच्या सरकारी जमीन घोटाळ्याच्या संबंधाने अनेक जमिनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचे आरोप आहेत. हे केवळ आरोप नाहीत, तर उच्च न्यायालयानेही या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. याचा अर्थ असा आहे की, भाजपकडे जी – जी माणसे येतात, ती कुठून ना कुठून अत्यंत कष्टप्रद अवस्थेतील असतात, गुन्हेगारीचा ठपका ठेवलेली असतात किंवा कोणत्या तरी आरोपातून वाचण्यासाठी, घोटाळ्यातून वाचण्यासाठी त्यांना भाजपचे वॉशिंग मशिन फार गरजेची असते हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
आत्ता मुद्दा असा आहे की, भाजपची अशी कोणती मजबुरी आहे की त्यांना चांगली लोकं मिळतच नाहीत. भाजपकडे येणारी सर्वच माणसे गुन्हेगारी प्रवृत्तीची व सर्राईतच असणारीच कशी काय येऊ शकतात. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे काही उत्तर आहे का. कदाचित तुमच्याकडे काहीच उत्तर नाही. कारण, तुमचा पक्ष मुळाच भाड्याने जमवलेली पार्टी आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.