जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी भानुदास कर्डीले (वय 66) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागल्यामुळे तातडीने अहिल्यानगर येथील साईदीप साह्यद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने राहुरी मतदारसंघासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.
कर्डीले यांनी बुऱ्हाणनगर येथे दुधाचा व्यवसाय सुरू करून सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी बांधकाम आणि हॉटेल उद्योगाच्या माध्यमातून मोठी व्यावसायिक पकड मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील ते सक्रीय होते. 2009 ला त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढली. त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा 2014 ला राहुरी मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2009 ते 2019 असे सलग दहा वर्ष त्यांनी राहुरीचे विधानसभेत नेतृत्व केले.
2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डीलेंचा पराभव करत त्यांनी विजयाच्या हॅट्रीकपासून रोखले होते. मात्र, 2024 च्या निवडणुकीत या पराभवाची परत फेड करत कर्डीले यांनी प्राजक्त तनपुरेंना पराभूत केले होते. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आ.कर्डीलेंचे लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील- पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले की, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो, ही प्रार्थना! आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत!
भावपूर्व श्रद्धांजली!